कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रूळावर आणणे हीच दोन मोठी आव्हानेः अजित पवार

0
66
संग्रहित छायाचित्र.

मुंबई आजच्या घडीला राज्यासमोर कोरोनावर मात करणे आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही दोनच  मोठी आव्हाने आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रात्री ९ वाजता दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना कुणीही घराबाहेर पडू नका, रस्त्यावर येऊ नका, गर्दी टाळा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत साडेसहाशेपर्यंत झालेली वाढ थांबवणे, दररोज वाढणारे मृत्यू रोखणे, आरोग्य, पोलिस, अन्य यंत्रणांवरचा ताण कमी करणे, टाळाबंदीने ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही आपल्या सर्वांसमोरची प्रमुख आव्हाने आहेत. या आव्हानांवर लवकर मात करण्यासाठी नागरिकांनी संयम व शिस्त पाळली पाहिजे. कोरोनाचा प्रसार पाहता हा विषाणू आपल्या गावात, वस्तीत, सोसायटीत पोहोचला आहे. त्याला स्वत:च्या घरात न आणणे, स्वत:ला, कुटुंबाला त्याची लागण होऊ न देणे हे आता तुमचे कर्तव्य आहे. आणखी काही दिवस संयम पाळला आणि घराबाहेर पडणे टाळले तर कोरोना नक्कीच आटोक्यात येऊ शकेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींनी आज रात्री ९ वाजता दारात, खिडक्यांत दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत असताना राज्यातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. रस्त्यावर  उतरुन गर्दी करणे टाळावे. सध्या सॅनिटायझरने हात स्वच्छ केले जातात, अशा वेळी दिव्याजवळ हात नेल्यास अपघात होऊ शकतो. त्याबाबतही सावध राहण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा