गर्दी करणाऱ्यांवर आता थेट गुन्हे नोंदवणारः औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

0
183
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना राबवत आहे. त्याला नागरिकांनी सहकार्य करत कामाशिवाय घराबाहेर पडणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे कटाक्षाने टाळावे. येत्या दहा पंधरा दिवसात विशेष खबरदारी घेणे आवश्यक असून त्यादृष्टीने आता गर्दी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महानगरपालिका व्यापक प्रमाणात प्रयत्नशील असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. जिल्ह्यात आणि शहरात विविध मार्गांवरून, बाहेर गावातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी (स्क्रिनिंग) वैद्यकीय पथकामार्फत विमानतळ, रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, नगर रोडवरील टोलनाका या ठिकाणी २४ तास तपासणी सुरू आहे, असे चौधरी म्हणाले.

जिल्ह्याच्या हद्दीवर आरोग्य तपासणीः ग्रामीण भागातील जिल्ह्याच्या हद्दीवरील ठिकाणांवर आरोग्य तपासणी करून संशयितांना तातडीने जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे. गर्दीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालयांत नागरिकांनी येऊ नये तर ऑनलाइन आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे चौधरी म्हणाले.

माहिती लपवणाऱ्यांवर कारवाईः सर्व धर्मगुरू, धार्मिक संस्थांनी देवस्थानांच्या ठिकाणी दर्शनामुळे गर्दी होते, अशा सर्व धार्मिक स्थळांवर गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी मंदिर, मस्जीद, गुरूव्दारा, चर्च, विहार यासह सर्व धार्मिक स्थळ बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास धर्मगुरू व संस्थाचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद केली आहेत. गर्दी होऊन एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी गर्दीत जाणे, गर्दी करणे टाळावे. विदेशात प्रवास करून आलेल्या नागरिकांनी जर त्याबाबत स्वत:हून वैद्यकीय तपासणी केली नाही तर अशी माहिती लपवून ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

अफवा, चुकीची माहिती पसरवू नकाः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली असून साथरोग कायद्यान्वये प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे अधिकार दिले आहेत. नागरिकांनी आता खबरदारी घेऊन प्रशासनाच्या उपाययोजनांना सहकार्य करत हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जबाबदारीने सतर्कता वाढवावी. अफवा, चुकीची माहिती पसरवू नये. विदेश प्रवास किंवा अशा व्यक्तींच्या संपर्कात आल्याची माहिती लपवू नये. असे केल्याने विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात मोठी अडचण निर्माण होईल. जिल्ह्यात या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन पूर्णत: प्रभावी उपाययोजना राबवत आहे त्या नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

जमावबंदीचे पालन सक्तीचेः मास्क, सॅनिटायझेशन, औषधे यांची अवैध विक्री आणि साठा करणाऱ्यांवर, चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, जिल्ह्यात शहरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला असून आदेश झुगारून गर्दी करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. तरी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा