देशातील पहिले दोन रूग्ण महाराष्ट्रात कोरोनामुक्त, अजित पवारांनी मानले डॉक्टरांचे आभार

0
79
संग्रहित छायाचित्र.

मुंबईदेशातील पहिले ‘कोरोना’बाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण आज गुढीपाडव्याला ‘कोरोना’मुक्त होऊन घरी परतत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. होळीला कोरोनाबाधित ठरलेले हे दोघे आज गुढीपाडव्याला कोरोनामुक्त झाल्याचे सांगून या रुग्णांवर तसेच राज्यातील विविध रुग्णालयात ‘कोरोना’बाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभारही  मानले आहेत.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 5 ने झालेली वाढ आणि राज्यातील रुग्णांची संख्या 112 वर पोहचणं गंभीर आहे. नागरिकांनी आता स्वयंशिस्त आणि संयम पाळून घरातच थांबावे. खरेदीसाठी गर्दी करु नये. खरेदी करताना सुरक्षित अंतराची मर्यादा स्वत:हून पाळावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

चढ्या भावाने विक्री केल्यास गुन्हेः राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्याची कुठलीही टंचाई नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सरकार सर्वकाळ नियमित ठेवेल.  जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

कारणांशिवाय घराबाहेर पडल्यास कारवाई होणारचः अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतीलंच, परंतु जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. अमेरिकेने ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी लष्कराची मदत घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेने अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असेही आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा