कोरोनाग्रस्तांवर होणार आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार

0
26

मुंबईराज्यातील कोरोना बाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता कोरोना उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

१ एप्रिलपासून राज्यभरात या योजनेंतर्गत सुमारे १००० रुग्णालयांचा समावेश होणार असल्याने त्यामध्ये कोरोनाबाधित मोफत उपचार घेऊ शकतील. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे योजनेतील सहभागी रुग्णालयातील सुमारे २००० व्हेंटिलेटर्सही उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

राज्यात आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी अनेकविध उपाययोजनांपैकी या योजनेमध्ये सहभागी असलेल्या रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचाराची सुविधा जनआरोग्य योजनेंतर्गत केली जाणार आहे. योजनेच्या लाभासाठी पात्रतेच्या अटी कोरोनाबाधित रुग्णांसाठी  शिथील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त कुठलाही रुग्ण योजनेंतर्गत सहभागी रुग्णालयात उपचार घेऊ शकेल.

योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांच्या सहभागाची संख्या वाढणार असल्याने कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यकता भासल्यास किमान २००० व्हेंटिलेटर्स, सुमारे एक लाख खाटाही या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे टोपे यांनी संगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा