पाचोरा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा अभिनव उपक्रम

0
53

जळगावः जगभर पसरत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. याचे फलित म्हणून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील देशमुखवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार सुरेखा संजय महाले यांनी धान्य वाटपासाठी नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा अभिनव उपक्रम देशाला घालून दिला आहे.

सुरेखा महाले यांनी आपल्या दुकानात स्वस्त धान्य वाटप करण्यासाठी एक मोठे नरसाळे आणि स्वतंत्र पाईप ठेवले आहे. लाभार्थी दुकानात आल्यावर दुकानदार ई-पॅास मशिनद्वारे स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून लाभार्थ्यासमोर धान्य मोजतात. त्यानंतर लाभार्थ्यास पाईपच्या दुसऱ्या टोकास पिशवी धरण्यास सांगितले जाते. लाभार्थीनी पाईपच्या दुसऱ्या टोकास पिशवी लावल्यानंतर त्या दुकानातून मोठ्या नरसाळ्यातून धान्य सोडतात. हे धान्य नरसाळ्यातून आपोआप लाभार्थीच्या पिशवीत पडते. यामुळे सोशल डिस्टन्सिंग होत असून लाभार्थ्यांना उभे राहण्यासाठी ५ फूट अंतरावर चौकोन तयार करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांनी रांगेत या चौकोनातच उभे राहण्याच्या सूचनाही त्या सर्वांना देतात. जळगाव जिल्ह्यात या अभिनव उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

महाले यांना ही कल्पना कशी सूचली असे विचारले असता, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार मीच माझा रक्षक मानून लाभार्थ्यांना काही अंतर ठेऊन धान्य वाटप कसे करता येईल यावर विचार केला. काही दिवस पिठाची चक्की चालवलेली असल्याने यातूनच ही अभिनव कल्पना सुचल्याचे महाले यांनी सांगितले. या उपक्रमासाठी पत्रा, पाईप, एलबो, रिबीट आणि स्टॅंड यासाठी ९४५ रुपये तर मजुरीसाठी ७०० रूपये असा एकूण १६४५ रुपये खर्च आला.

सुरेखा महाले या पाचोरा शहरात गेल्या २० वर्षापासून स्वस्तधान्य दुकान चालवतात. त्यांच्याकडे एकूण ४७० लाभार्थी असून हे लाभार्थी पण माझ्याच कुटूंबाचे घटक आहेत. त्यांची सुरक्षितता ही माझी सुरक्षितता असल्याने मीच माझा रक्षक या उक्तीप्रमाणे ही कल्पना राबविल्याचेही महाले यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा