साठेबाजी, चढ्या भावाने विक्री करणाऱ्या किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांवर आता थेट कारवाई

0
50
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांकडून वस्तूंचा काळाबाजार व अतिरिक्त भाववाढ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. राज्याच्या वैधमापनशास्र विभागाने जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी व भाववाढ नियंत्रित करण्यासाठी पथके तयार केली आहेत. ही पथके किरकोळ तसेच घाऊक व्यापार प्रतिष्ठाने, गोदामे, शीतगृहे इत्यादी ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता व दरांची पडताळणी करून कारवाई करणार आहेत.

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होऊ शकते. याबाबत पुरवठा विभागासोबतच महसूल विभाग आणि वैधमापनशास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणारे व चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ सबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून किमती वाढविल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. राज्यात जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही टंचाई नसून किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा