वर्क फ्रॉम होम न करणारी कार्यालये सक्तीने बंद करूः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

0
137

मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा न देणाऱ्या राज्यातील खासगी कंपन्या आणि आस्थापनांची कार्यालये सक्ती बंद करू, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी थेट प्रक्षेपणाद्वारे संवाद साधला. त्यात त्यांनी हा इशारा दिला. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी बसून काम करण्याची सुविधा देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्याला प्रतिसादही मिळतो आहे. परंतु अद्यापही काही कंपन्या आणि खासगी आस्थापनांची कार्यालये सुरू असल्याचे निदर्शास आले आहे. या कार्यालयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली नाही तर नाईलाजाने अशी कार्यालये सक्तीने बंद करावी लागतील, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

गर्दी टाळणे हा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याचा उपाय असल्यामुळे घराबाहेर पडू नका आणि गर्दी करू नका, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. सरकारी कार्यालयांतील गर्दी टाळण्यासाठी आधी सरकारने दिवसाआड रोज ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थितीचा निर्णय घेतला होता. आता आज २५ टक्केच कर्मचारी उपस्थितीचा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड हा महानगरांतील जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा