कोणालाही ऑनलाइन मद्यविक्रीची परवानगी नाहीः राज्य उत्पादन शुल्क विभागाचा खुलासा

0
33
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुठल्याच अनुज्ञप्तींना ऑनलाइन मद्य विक्री करण्याची परवानगी दिलेली नाही‌. त्यामुळे नागरिकांनी यासंदर्भातील फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे.

 ऑनलाईन वाईन (online Wine) किंवा ऑनलाईन लिकर (Online Liquor) या मथळ्याखाली घरपोच मद्य सेवा दिली जाईल, अशा प्रकारच्या फेक मेसेजद्वारे (Fake Messages) समाज माध्यमांवर फसव्या जाहिराती दिल्या जात आहेत. ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाईल असे सांगून चोरट्यांकडून फसवणूक केली जात आहे. या फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने म्हटले आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन झालेला आहे. राज्यातील ‌ सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर निरंतर कारवाई सुरू आहे.

२ हजार २८१ गुन्ह्यांची नोंदः यासंदर्भात राज्यात काल १४७ गुन्हे नोंदविण्यात आले असून ६६ जणांना अटक करण्यात आली आहे. ११ वाहने जप्त करण्यात आली असून ३० लाख ४८ हजार किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबरोबरच २४ मार्च ते १० एप्रिलपर्यंत पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्यात २ हजार २८१ गुन्हे नोंदविण्यात आले असून ८९२ जणांना अटक करण्यात आली आहे. १०७ वाहने जप्त करण्यात आली असून  ५.५५ कोटी रुपये  किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा