दुबईहून आलेला अहमदनगरचा पुरुष कोरोना बाधित; राज्यातील एकूण रुग्णसंख्या ४८ वर

0
106
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई : राज्यात आज दिवसभरात तीन  कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४८ झाली आहे. नगर जिल्ह्यातील ५१ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळला असून तो आपल्या पत्नीसह दुबईला गेला होता. त्याची पत्नी कोरोना निगेटिव्ह आढळली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, आज आरोग्यमंत्र्यांनी मुंबई विमानतळावर जाऊन तेथे सुरू असलेल्या स्क्रिनिंग सुविधेची पाहणी केली.

राज्यात आज ७८ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकू १३०५ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत १०३६ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ९७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १३०५ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

आज दुपारी आरोग्यमंत्री टोपे यांनी मुंबई विमानतळावर जाऊन प्रवाशांची होत असलेल्या स्क्रिनिंग सुविधेची पाहणी केली. ही तपासणी कशी केली जाते याची माहिती घेतली. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधत त्यांचे कौतुकही केले.

कोरोना बाधितांचा तपशील पुढीलप्रमाणे : पिंपरी चिंचवड मनपा -११, पुणे मनपा – ८, मुंबई -९, नागपूर -४ , यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण  प्रत्येकी-३, अहमदनगर-२, रायगड, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी प्रत्येकी -१,  एकूण-४८    

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा