औरंगाबाद, नागपूरसह सहा ठिकाणच्या कोरोना चाचणी केंद्रांना सीएमआरच्या परवानगीची प्रतीक्षा

0
59

मुंबई: कोरोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील औरंगाबाद, नागपूर, धुळे, अकोला, सोलापूर, मिरज या सहा ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.

कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देशांतील आरोग्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी केली.

राज्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केंद्राच्या सूचनेनुसार कार्यवाही केली जात आहे. राज्यात आतापर्यंत १८ कोरोनाबाधितांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या कोरोना चाचणी सुविधा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विस्तारण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. मात्र या ठिकाणी चाचणी सुरू करण्यासाठी आयसीएमआरकडून परवानगी मिळणे गरजेचे आहे. परवानगी मिळताच धुळे, अकोला, औरंगाबाद, सोलापूर, मिरज, नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चाचण्या करता येतील, असे टोपे यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधासाठी अत्यावश्यक वैद्यकीय संसाधने जशी एन ९५ मास्क, ट्रिपललेअर मास्क, पीपीई, व्हेंटिलेटर याची आवश्यक ती उपलब्धता राज्यात आहे. मात्र आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास भविष्यकालीन तरतूद म्हणून या अत्यावश्यक वैद्यकीय साधनसामुग्रीची पूर्तता केंद्र सरकारने करावी, अशी मागणीही टोपे यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा