औरंगाबादेत तीन नवे कोरोना संशयित रूग्ण, सिडको एन-४ मध्ये युद्धपातळीवर तपासणी

0
126

औरंगाबाद : औरंगाबादेत गुरूवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर आज, शुक्रवारी तीन कोरोना संशयित रूग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले आहेत.  दोन कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या ३४ जणांच्या घशातील द्राव तपासणीला पाठवण्यात आला आहे. त्यापैकी ३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सिडको एन-४ मधील ३५० घरे प्रशासनाने सील केली आहेत. या भागातील नागरिकांची तपासणी युद्ध पातळीवर करण्यात येत आहे.

गुरूवारी आरेफ कॉलनीतील २१ वर्षीय तरूण आणि सिडको एन-४ भागातील ५५ वर्षीय महिलेला कोरोनाची तीव्र लक्षणे आढळून आली होती. या घटनेनंतर प्रशासनाने आरेफ कॉलनी आणि सिडको एन-४ भाग सील करून टाकला. सिडको एन ४ भागात ज्या वसाहतीत ही महिला राहते तिच्या घरापासून १०० मीटरपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरात सुमारे ३०० घरे आहेत. त्यापैकी १९५ घरांचा सर्वे करून ८६५ नागरिकांची आज तपासणी करण्यात आली आहे.

तपासणी करण्यासाठी महापालिकेने १४ कर्मचारी तैनात केले आहेत. या महिलेच्या संपर्कात आलेल्या २५ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. या महिलेने आधी खासगी रूग्णालयात उपचार घेतले होते. ते रूग्णालयही सील करण्यात आले आहे. या महिलेच्या घरी कामाला येणारी मोलकरीण आणि तिच्या मुलीचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

गुरूवारी सायंकाळी दाखल रूग्ण व शुक्रवारी दाखल अशा एकूण ३४ रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना चाचणी केंद्रात पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी ४ जाणांचे अहवाल प्राप्त असून ते निगेटिव्ह आहेत. येथून एकूण ३० जणांच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल येण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा