निवडणूक संशोधनासाठी पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना निवडणूक आयोगाची शिष्यवृत्ती

0
108
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : स्थानिक‍ स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे विविध पैलू समजून घेण्यासाठी पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प हाती घ्यावेत. त्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

लोकशाही पंधरवड्यानिमित्त एस. के. सोमय्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या लोकशाही, निवडणुका व सुशासन संस्थेतर्फे (आयडीईजीजी) आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मदान म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाया आहे. या निवडणुका अधिक चुरशीच्या आणि गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळे त्यांचे विविध पैलू समजून घेणे आवश्यक असल्याने त्याबाबत शास्त्रीय पद्धतीने संशोधन होण्याची गरज आहे. यात विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. राज्य निवडणूक आयोग निश्चितच सहकार्य करेल.

राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत दरवर्षी लोकशाही पंधरवडा साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सोमय्या महाविद्यालयात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने लोकशाही आणि मतदार जागृतीसंदर्भात एका प्रदर्शनाचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन मदान यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा