फडणवीस सरकार हे राज्यावर आलेले सुलतानी संकटः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

0
257
संग्रहित छायाचित्र.

विशेष मुलाखत

प्रमोद चुंचूवार, राजकीय संपादक, फ्री प्रेस जर्नल, मुंबई

भाजप-शिवसेनेचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार हे राज्यावर आलेले एक मोठे सुलतानी संकट असल्याचे पाच वर्षात सिद्ध झाले आहे. काँग्रेस कधीही संपणार नाही, ती जनतेच्या मनात आहे. जनतेला सोबत घेण्यात आम्ही कमी पडलो, अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी फ्री प्रेस जर्नलचे राजकीय संपादक प्रमोद चुंचूवार यांना दिलेल्या खास मुलाखतीत दिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लोक वेगवेगळ्या पद्धतीने मतदान करतात. विधानसभा निवडणुकीत राज्यातील ज्वलंत प्रश्न आणि लोकांच्या मूलभूत समस्या यांच्यावर लोक मतदान करतील त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार येईल, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

आमच्याकडून काही मूलभूत चुका झाल्या. आम्ही सत्तेत असल्याने पक्षाच्या तत्वज्ञानाच्या प्रचाराकडे दुर्लक्ष केले. यासाठी तरुणाईसह विविध वर्गाची जी प्रशिक्षण शिबिरे आम्ही घ्यायला हवी होती, ती आम्ही घेतलीच नाही. समाजवादी-धर्मनिरपेक्ष विचार आणि या विचारातच भारताचे हित कसे दडले आहे, हे नव्या पिढीला समजावून सांगण्यात आम्ही कमी पडलो. यामुळे तरुण पिढीची दिशाभूल करणे आमच्या विरोधकांना शक्य झाले.

प्रश्नः काँग्रेस पक्ष पराभवाच्या छायेत असल्याने विधानसभा निवडणुकीसाठी कुणी अर्ज करायला तयार नाही असे चित्र निर्माण झालेय. वस्तुस्थिती काय आहे?

उत्तर असे मुळीच नाही. उलट आमच्याकडे उमेदवारी मागणारे ९०० अर्ज आलेत. विदर्भात तिकीट मिळविण्यासाठी सर्वात तीव्र स्पर्धा आहे. मराठवाड्यात ही अशीच स्पर्धा आहे. ज्या अर्थी विदर्भात मोठ्या संख्येने लोक उमेदवारी मागत आहेत. त्या अर्थी या भागात पक्षाच्या उमेदवारांच्या विजयाची शक्यता नक्कीच जास्त आहे.

प्रश्नः मात्र सत्ताधारी लोक तर काँग्रेस राष्ट्रवादीला एकत्रितपणे ५० जागाही मिळणार नाहीत असे म्हणत आहेत. आपल्याला काय वाटते?

उत्तरः हा अतिआत्मविश्वास त्यांना लोकसभेच्या निकालामुळे आला आहे. लोकसभा आणि विधानसभेचे निकाल स्वतंत्र असतात हे आपण अनेकदा पाहिले आहे. दोन्ही निवडणुकीत लोक वेगवेगळे मतदान करतात हे आपण पाहिले आहे. लोकसभेत राष्ट्रीय प्रश्न महत्वाचे ठरवून मतदान होते. राज्याच्या निवडणुकीत राज्याचे ज्वलंत प्रश्न, विधानसभा मतदारसंघातील प्रमुख प्रश्न केंद्रस्थानी येतात आणि त्यावर मतदान होते. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यात आम्ही विधानसभा जिंकली, मात्र लोकसभेत वेगळे चित्र निर्माण झाले. काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणा देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये आम्ही अटीतटीची लढत भाजपला दिली. १९८० च्या दशकात काँग्रेस फुटली तेव्हाही असेच चित्र होते. मात्र, काँग्रेसचे बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री झाले. १९९९ मध्येही राज्यात काँग्रेस फुटली तेव्हाही असेच चित्र होते. मात्र काँग्रेस नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. काँग्रेस पक्ष जनतेच्या मनात आहे, मात्र जनतेला सोबत घेण्यात आम्ही कमी पडतो आहोत.

प्रश्नः आपण म्हणताय काँग्रेस जनतेच्या मनात आहे, मात्र काँग्रेस संपलीय, असा दावा भाजपशिवसेना करत आहे. सर्वत्र काँग्रेसची ताकद कमी होताना दिसते आहे

उत्तरः काँग्रेसचे तत्वज्ञान हे शाश्वत तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान स्वातंत्र्य चळवळीतून आलेले आहे. याच तत्वज्ञानातून भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली आहे. त्यामुळे काँग्रेस कधीही देशातून संपणार नाही. कारण काँग्रेस हा केवळ पक्ष नाही तर तो विचार आहे. त्यामुळे तो कधीही संपणार नाही. पक्षाची ताकद कमी जास्त होत राहील. लोकांनी भावनिक लाटेत मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज भाजप सत्तेत आली. मात्र सध्या असलेली मंदीची लाट या भावनिक लाटेवर भारी पडते आहे. बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था, महागाई यांचे चटके सर्वसामान्यांना बसू लागले आहेत. थेट व्यापारीही आता मंदीत गटांगळ्या खात आहेत. यामुळे लोक पुन्हा एकदा मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मतदान करतील आणि काँग्रेस पक्षाची ताकद राज्यात वाढेल याबद्दल मला शंका नाही.

लोकांनी भावनिक लाटेत मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज भाजप सत्तेत आली. मात्र सध्या असलेली मंदीची लाट या भावनिक लाटेवर भारी पडते आहे. बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था, महागाई यांचे चटके सर्वसामान्यांना बसू लागले आहेत. थेट व्यापारीही आता मंदीत गटांगळ्या खात आहेत. यामुळे लोक पुन्हा एकदा मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मतदान करतील.

प्रश्नःकाँग्रेसवर ही परिस्थिती ओढवायला काँग्रेस पक्षच जबाबदार आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? यासंदर्भात पक्षाने काही आत्मपरीक्षण केलेय का?

उत्तरः होय, नक्कीच आमच्याकडून काही मूलभूत चुका झाल्या. आम्ही सत्तेत असल्याने पक्षाच्या तत्वज्ञानाच्या प्रचाराकडे दुर्लक्ष केले. यासाठी तरुणाईसह विविध वर्गाची जी प्रशिक्षण शिबिरे आम्ही घ्यायला हवी होती, ती आम्ही घेतलीच नाही. समाजवादी-धर्मनिरपेक्ष विचार आणि या विचारातच भारताचे हित कसे दडले आहे, हे नव्या पिढीला समजावून सांगण्यात आम्ही कमी पडलो. यामुळे तरुण पिढीची दिशाभूल करणे आमच्या विरोधकांना शक्य झाले. माझे आजोबा हे महात्मा गांधींसोबत मिठाच्या सत्याग्रहात सामील झाले होते. वडील भारत छोडो आंदोलनात सामील झाले होते. मी काँग्रेस, राष्ट्रसेवा दल, साने गुरुजी यांच्या विचारात वाढलो. त्यामुळे माझी जडणघडण आपोआपच काँग्रेस विचारात झाली. आज मात्र नव्या पिढीला काँग्रेस तत्वज्ञानाच्या मूळ गाभ्यासोबत जोडणं आवश्यक आहे. धर्म आणि जातीच्या नावावर लोकांना विभाजित करून राजकारण करणे सोपे आहे. मात्र, धर्मनिरपेक्ष विचारांसाठी सर्वांना एकत्र आणणे कठीण आहे.

प्रश्नः निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसची नेमकी काय तयारी सुरु आहे ? आघाडीच्या वाटाघाटी कुठवर आल्या आहेत?

उत्तरः राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची जागावाटपाबद्दल चर्चा सुरू आहे. यात कोणतेही मतभेद नाहीत. निवडून येण्याची क्षमता हाच जागा वाटपाचा महत्वाचा निकष असेल. त्यानुसार आम्ही जागावाटप निश्चित करीत आहोत. मला शेवटच्या दोन महिन्यांत संधी देण्यात आली आहे. त्यामुळे वेळ खुपच कमी आहे. उमेदवार निवड, प्रचार यंत्रणा उभी करणे, जागावाटप वाटाघाटी या सर्व आघाड्यावर मी काम करतो आहे. मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू आहेत. धर्मनिरपेक्ष विचार बळकट करून देशात लोकशाही टिकविणे याला आम्ही प्राधान्य देत आहोत.

यावर्षी कोल्हापूर सांगलीची पूर पातळी वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकसभेच्या विजयाच्या ‘जल्लोष’ यात्रेत व्यस्त होते. जलसंपदामंत्री ३७० रद्द झाल्याने नाचण्यात व्यस्त होते. मुख्यमंत्री हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. राज्याचे प्रशासन हे नेहमी मुख्य माणसाकडे पाहून काम करीत असते. मुख्य माणूसच असा जल्लोषात मग्न आणि संकटाबद्दल बेफिकीर आहे म्हटल्यावर प्रशासनही तसेच वागू लागते.

प्रश्नः राजू शेट्टींनी वा मित्र पक्षांनी किती जागा मागितल्या आहेत?

उत्तरः भरपूर जागा मागितल्या आहेत. मात्र विजयाची खात्री असलेले मतदार संघ किंवा जिथे आमच्या उमेदवारापेक्षा मित्र पक्षांचे उमेदवार सरस असतील, तर त्या जागा आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत.

प्रश्नः वंचित बहुजन आघाडीसोबतच्या आघाडीची स्थिती काय आहे?

उत्तरः आमची त्यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. त्यांच्या प्रस्तावांवर चर्चा सुरू आहेत. मात्र वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादीलासोबत घेऊन निवडणूक लढण्यास फारसी इच्छूक नाही. त्यांना केवळ काँग्रेससोबत आघाडी हवी आहे. हे आम्हाला तरी शक्य नाही.

प्रश्नःविधानसभा निवडणुकीत आपल्या प्रचाराचा भर नेमका कोणत्या मुद्द्यांवर राहील?

उत्तरः ही निवडणूक आम्ही जनतेचे गंभीर प्रश्न, त्यांच्या जगण्या-मरण्याची समस्या आणि शेती, ग्रामीण भागातील संकट यावर केंद्रित करणार आहोत. भाजप-शिवसेना युतीचे सरकार हे सर्वच आघाड्यावर कसे पूर्णतः अपयशी ठरले आहे, हे जनतेला आम्ही समजावून सांगू. सरसकट कर्जमाफी ही केवळ कागदावर आहे. पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. आमची सत्ता असताना राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी ५० टक्के भार उचलून शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई देत होतो. शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे प्रीमियमचे पैसे सरकारकडे जमा होत होते आणि नुकसान भरपाईही सरकार करीत होते. केवळ पीक विमा काढणे, प्रीमियमचे पैसे गोळा करणे आणि नुकसान भरपाईच्या दाव्यावर प्रक्रिया करुन सरकारकडे कोणत्या दाव्यात किती नुकसान भरपाई द्यायची आहे याची माहिती देणे, सरकारच्या वतीने ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणे ही कामे केंद्र सरकारची पीक विमा कंपनी करीत होती. प्रोसेसिंग फी म्हणून याचा ठरलेला मोबदला आम्ही पीक विमा कंपनीला देत होतो. मात्र, भाजप-शिवसेना सरकारने सत्तेत आल्यावर ही पद्धत बदलून सारे काही खासगी पीक विमा कंपन्यांकडे सोपविले. या कंपन्यांकडे प्रीमियमचे पैसे जमा झाल्याने प्रचंड नफाखोरी करता आली. सत्तेत बसलेल्याचे हितसंबंध गुंतले असतील म्हणून अश्या कंपन्यांना ही कामे देण्यात आली. यात आज मरण ओढवले ते शेतकऱ्यांचे. याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी उलट शिवसेना मोर्चे काढण्याची नाटके करून फसवणूक करीत आहे.

फडणवीस सरकारमधील डझनभर मंत्र्यांचे घोटाळे आम्ही उघडकीस आणले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते असताना मुंबई शहराचा डीपी प्लॅन घोटाळा बाहेर काढला. खारघर येथील सिडको जमिनीचा घोटाळाही आम्ही उघडकीस आणला होता. प्रकाश मेहता यांच्या घोटाळ्यावर लोकायुक्तांनी शिक्कामोर्तब केल्याने त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव ही या घोटाळ्यात आले होते. म्हणूनच बहुधा त्यांनी जाहीर करूनही मेहता यांच्या चौकशीचा लोकयुक्तांचा अहवाल सादर केला नाही.

प्रश्नः शेतकऱ्यांच्या समस्या हाताळण्यात फडणवीस सरकार कितपत यशस्वी ठरले?

उत्तरः मी स्वतः राज्याचा कृषी मंत्री म्हणून काम केले आहे. फडणवीस सरकार म्हणजे शेतकऱ्यांसाठी सुलतानी संकट ठरले आहे. मुळात या सरकारमध्ये अनेक वर्षे राज्याला पूर्ण वेळ कृषिमंत्री नव्हता. दुष्काळी परिस्थिती हाताळण्यातही राज्य सरकार कमालीचे अपयशी ठरले आहे. आज भर पावसाळ्यातही दुष्काळग्रस्त भागात ४ हजार पाण्याचे टँकर पाठवावे लागत आहेत. हे टँकरही वेळेवर मिळत नाही. जलयुक्त शिवारसारखे प्रकल्प राबविल्याचे सरकार सांगते, तर ऐन पावसाळ्यात पाऊस होऊन ही ४ हजार टँकर का पाठवावे लागत आहेत? आमचे सरकार असताना मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री राज्यभर फिरून महसुली विभाग निहाय खरीप पिकाबाबत पूर्व तयारी बैठक घ्यायचो. कर्ज वाटपाचा आढावा घ्यायचो. स्थानिक लोकप्रतिनिधी, बँकाचे प्रतिनिधी, जिल्हा प्रशासन यांच्याशी चर्चा करायचो. ही पद्धतच राज्य सरकारने बंद केलीय. त्यामुळे पावसाळा सुरू होऊन जवळपास 3 महिने होऊनही राज्यात अद्याप ३० टक्के पीक कर्जाचे वाटप झालेले नाही. यातही चिंताजनक बाब म्हणजे या ३० टक्क्यात सरकारी बँकांचा वाटा केवळ १० टक्के आहे.

प्रश्नः पूरपरिस्थिती हाताळण्याच्या मुद्यावर राज्य सरकारच्या कामगिरीचे मूल्यांकन आपण कसे कराल?

उत्तरः २००५-०६ या काळात राज्यात असाच पूर आला तेव्हा मी राज्याचा कृषी मंत्री होतो. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पुराचे पाणी वाढत आहे, असे प्राथमिक संकेत मिळताच पालकमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यात थांबण्याचे आदेश दिले. मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून पतंगराव कदम यांनी या आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणा चोख काम करतील आणि पूरग्रस्तांना सर्व मदत वेळेत मिळेल याची खबरदारी घेतली. मात्र यावर्षी कोल्हापूर सांगलीची पूर पातळी वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकसभेच्या विजयाच्या ‘जल्लोष’ यात्रेत व्यस्त होते. जलसंपदामंत्री ३७० रद्द झाल्याने नाचण्यात व्यस्त होते. मुख्यमंत्री हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. राज्याचे प्रशासन हे नेहमी मुख्य माणसाकडे पाहून काम करीत असते. मुख्य माणूसच असा जल्लोषात मग्न आणि संकटाबद्दल बेफिकीर आहे म्हटल्यावर प्रशासनही तसेच वागू लागते. जिल्हाधिकाऱ्यांना साधा फोन करून तुमच्याकडे काय स्थिती आहे, असे विचारले तरी यंत्रणा सतर्क होते. मात्र फडणवीस यांनी सर्वांना गृहीत धरले. अल्मट्टीच्या पाण्याचा विसर्ग करण्याचा कोणताही पाठपुरावा वेळेत झाला नाही. त्यामुळे फुगवटा वाढून पूर आला. तीन-चार दिवस त्यांच्याकडे पालकमंत्री फिरकले नाहीत. आज जनतेत इतका रोष आहे की पालकमंत्री पूरग्रस्त जिल्ह्यांत फिरू शकत नाही.

प्रश्नः शहरी भागातील विकास आणि विशेषत: अर्थव्यवस्था या आघाडीवरील सरकारच्या कामगिरीबद्दल आपण समाधानी आहात का?

उत्तरः केंद्र असो की राज्यातील सरकारवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेप्रमाणे शहरी अर्थव्यवस्था कोलमडली आहे. वाहन क्षेत्रात मंदीची लाट येणे हे अर्थव्यवस्थेच्या मंदीचे पहिले लक्षण आहे. अर्थव्यवस्थेची चाके वाहनांच्या ‘टायर’वर अवलंबून असतात. रघुराम राजन असोत की राहुल बजाज यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र कसे चिंताजनक आहे ते स्पष्ट करीत आहेत. स्मार्ट सिटीचे ढोल खूप बडवण्यात आले, मात्र ५ वर्षात एकही स्मार्ट शहर निर्माण करता आले नाही. आज राज्यभर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. सामाजिक आरोग्य असो की सार्वजनिक आरोग्य या समस्या चिघळण्यात या सरकारने हातभार लावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरात कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे.

प्रश्नः काँग्रेसच्या काळात मंत्र्यांवर जसे भ्रष्टाचाराचे आरोप होते तसे आज भाजप शिवसेनेच्या मंत्र्यांवर नाहीत. हे सरकार खरेच पारदर्शक आहे?

उत्तरः फडणवीस सरकारमधील डझनभर मंत्र्यांचे घोटाळे आम्ही उघडकीस आणले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते असताना मुंबई शहराचा डीपी प्लॅन घोटाळा बाहेर काढला. खारघर येथील सिडको जमिनीचा घोटाळाही आम्ही उघडकीस आणला होता. प्रकाश मेहता यांच्या घोटाळ्यावर लोकायुक्तांनी शिक्कामोर्तब केल्याने त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव ही या घोटाळ्यात आले होते. म्हणूनच बहुधा त्यांनी जाहीर करूनही मेहता यांच्या चौकशीचा लोकयुक्तांचा अहवाल सादर केला नाही. अशा सरकारला पारदर्शकतेचा दावा करण्याचा नैतिक अधिकार आहे का? सरकारने राज्य सेवा हक्क कायदा तयार करून विशिष्ट कालावधीत सरकारी सेवा देणे बंधनकारक करण्याची घोषणा केली. मात्र सेवा देणे तर दूरच विभागीय पातळीवरील सेवा आयुक्तही अद्याप नियुक्त केलेले नाहीत. हे सरकार केवळ भाषणबाजी करणारे सरकार आहे. प्रत्यक्षात या कामगिरी शून्य आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा