राज्यातही केंद्राप्रमाणेच पाच दिवसांचा आठवडा, अत्यावश्यक सेवा मात्र वगळणार

0
261

मुंबई : राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करणे यासह राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. केंद्राप्रमाणे राज्यात पाच दिवसांचा आठवडा करावा या मागणीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पाच दिवसांचा आठवडा करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. 45 मिनिटे वाढवून, अत्यावश्यक सेवा वगळून तसेच कामकाजाच्या दृष्टीने कुठलाही परिणाम होणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करावा. त्यावर निर्णय लवकरच घेण्यात येईल.

राज्यात रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मंत्रालयात महिलांसाठी विश्रामकक्ष, महिला अधिकाऱ्यांसाठी चक्राकार पद्धतीने होणाऱ्या बदल्यांबाबत धोरण, विश्रामगृहांमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी आरक्षण  या मागण्या यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. ज्या मागण्यांवर तातडीने निर्णय होणे शक्य आहे त्या प्रलंबित ठेवू नका अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वेतन त्रुटीबाबत खंड -2 अहवाल तातडीने सादर करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. त्यावर हा अहवाल महिन्या दीड महिन्यात सादर केला जाईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी यावेळी सांगितले. महागाई भत्त्याची थकबाकी देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. बैठकीस महासंघाचे संस्थापक ग.दि. कुलथे, महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे, उपाध्यक्ष विष्णू पाटील, एस.एम. पाटील, महिला उपाध्यक्ष डॉ.सोनाली कदम, सहसचिव सुदाम टाव्हरे, महिला सहसचिव वंदना गेवराईकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा