औरंगाबादेत दोन घोड्यांना घातक ग्लँडर्सची लागण, माणसांना संसर्गाचा धोका

0
116
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद: शहरातील कोणकवाडी भागात दोन घोड्यांना ग्लॅडर्स या संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. या रोग घोंड्यांपासून माणसांणाही होण्याचा धोका असून यामुळे मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने चर्चेअंती कोकणवाडीतील या दोन घोड्यांना दयामरण देण्याचा निर्णय घेतला आहे. या घोड्यांना गुरुवारी इंजेक्शन देऊन दयामरण दिले जाणार आहे.

  ग्लँडर्स हा एक जीवाणूजन्य रोग आहे. तो प्रामुख्याने घोडा, गाढव, खेचर या प्राण्यांतून आढळून येतो. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे रोग झालेल्या जनावरांच्या संपर्कात आलेल्या माणसांना त्याची लागण झाल्यास वेळप्रसंगी मृत्यू देखील होऊ शकतो. मागील महिन्यातच राज्यातील नांदेड, हिंगोली, बुलढाणा जिल्ह्यांत या रोगाची लागण झालेले घोडे आढळले होते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाला शासनाने राज्यभरात सतर्कतेचे आदेश दिले. त्यानुसार चार दिवसांपूर्वीच कोकणवाडी भागात जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांनी कोकणवाडी येथे तपासणी केली. तेव्हा जनार्दन तांबे यांच्या घोड्यांच्या तबेल्यातील दोन घोड्यांना ग्लॅडर्सची लागण झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यानुसार रक्ताचे नमुने घेऊन तपासणी केली असता, त्यांना ग्लँडरची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या घोड्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बुधवारी दि.26 पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांची बैठक झाली. त्यात हा गंभीर आजार असल्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत चौधरी, सहायक आयुक्त डॉ. डी. एस. कांबळे, वल्लभ जोशी, डॉ. राठोडकर, महापालिकेचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्या समितीने या दोन घोड्यांना दया मरण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी या दोन्ही घोड्यांना इंजेक्शन देऊन दयामरण दिले जाणार आहे. त्यानंतर या घोड्यांना जनावरांच्या स्मशानभूमीत पडेगाव परिसरात पुरले जाणार असल्याचे डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले.

मनपाच्या दप्‍तरी 82 घोडे: शहराच्या अनेक भागात पाळलेले घोडे लग्न समारंभासाठी भाड्याने दिले जातात. पालिकेकडे शहरभरात सध्या 82 घोडे असल्याची नोंद आहे. यातील दोन घोड्यांना ग्लँडर या भयंकर रोगाची लागण झाली आहे. यामुळे आता इतर घोड्यांची तपासणी केली जात आहे. कोकणवाडी भागात पाच किलोमीटरपर्यंत सर्व्हेक्षण केले जाणार असल्याचेही डॉ. नाईकवाडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा