मुंबई : सातारा-देवळाई नगर परिषद औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट केल्यानंतर येथील विकासकामांवर भर देण्यात येत आहे, अशी माहिती नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
शिंदे म्हणाले, सातारा- देवळाई भागाकरिता महानगरपालिकेकडून रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण, रस्त्यांचे व्हाईट टॅपिंग, भूमिगत गटारे, सरकारी नाल्यांवर पुलाचे बांधकाम करणे, आरोग्य केंद्र उभारणीसाठी इमारतींची दुरुस्ती व नाल्यातील गाळ काढणे इत्यादी कामे करण्याचे नियोजित आहे. या भागात एकूण 43 विकासकामे करण्यात आली असून त्यासाठी 1.98 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे. याशिवाय इतर कामांसाठी सुमारे दिडशे कोटीचा निधी देण्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी दिली. या विषयाच्या अनुषंगाने सदस्य सतिश चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.