गेल्या पाच वर्षांत काय केले, याचा जाब सरकारला विचारणार की नाही? : राज ठाकरेंचा सवाल

0
72
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः निवडणूक आली की अनेक हुजरे तुमच्यासमोर मुजरे करायला येतात. त्यानंतर तुम्हाला विसरुन जातात. मागची पाच वर्षे काय केले ? पाच वर्षात काय आश्वासने दिली होती , हे सगळे विसरतात. गेल्या 5 वर्षात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पण सरकारला त्याचे काही नाही. अमित शाह तर महाराष्ट्रातील एका सभेत शेतकऱ्यांवर बोलण्याऐवजी कलम 370 वर बोलत होते आणि त्या सभेच्या शेजारच्या गावात त्याच वेळेला एका शेतकऱ्यांने आत्महत्या केली. त्याची कुणाला काहीही पर्वा नाही. गेल्या पाच वर्षांत काय केले, याचा जाब राज्य सरकारला कोण विचारणार?, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी केला.

भांडूप येथे आयोजित सभेत बोलताना राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप- शिवसेनेवर जोरदार टिकास्त्र सोडले. भाजप- शिवसेनेने तुम्हाला दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पाळले नाही. याचा तुम्हाला सोयीस्कर विसर पडला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याला कर्जबाजारी केले, शेतकऱ्यांत निराशा पसरली आहे, असे भाजपने 2014 च्या जाहीरनाम्यात सांगितले होते. यांच्या पाच वर्षांच्या राजवटीत काय वेगळे घडले? फडणवीसांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या डोक्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज वाढले. नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. काय बदल झाला?, असे राज म्हणाले.

ही वेळ कशी आली? ती कुणी आणली?

नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे अर्थव्यवस्था घसरली. देशातील उद्योगधंदे बंद झाले. एका फटक्यात 10 हजार माणसे काढली जात आहेत. नोकऱ्यांची वाणवा आहे. ही वेळ कशी आली? ती कुणी आणली? याचा थोडा विचार करा. भाजपकडे गडगंज पैसा आहे. तो कुठून आला? त्यांना प्रश्न कोण विचारणार? असा हतबल महाराष्ट्र पाहू शकत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

खड्ड्यांचा प्रश्न अजूनही तसाच

महापालिकेच्या शाळांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या नोकरीत प्राधान्य हे आश्वासन होते. त्या आश्‍वासनाचे काय झाले? आधुनिक तंत्र वापरून खड्ड्यांचा प्रश्न कायमचा निकालात काढणार होतात. कुठे गेले ते तंत्रज्ञान? खड्डे पडत आहेत. कंत्राटदार कमवत आहे. तरीही आपण प्रश्न विचारत नाही, असे राज म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा