पवारांवर पीएच.डी. करण्याआधी पोस्टग्रॅज्यूएट व्हाः रुपाली चाकणकरांचा चंद्रकांत पाटलांना टोला

0
2153
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः शरद पवारांवर पीएच.डी. करण्याचा तुमचा मानस उत्तम आहे, पण त्यासाठी आधी पोस्टग्रॅज्यूएट व्हा, असा उपरोधिक सल्ला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.

पुण्यातील कर्वे रोडवर आपल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दहा खासदार नसले तरी ते कायम राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात. ते एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि आमच्याशीही डील करतात. त्यामुळे शिवाजी विद्यापीठात त्यांच्यावरच पीएच.डी. करण्याचा मी संकल्प सोडतो, असे गुरूवारी म्हटले होते. त्याचा रूपाली चाकणकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘चंद्रकांत पाटील, आपण आदरणीय शरद पवार साहेबांवर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. करणार आहात… उत्तम मानस आहे तुमचा, पण आधी त्यासाठी पोस्टग्रज्यूएट व्हावं. झाले पास तर ठीक नंतर पीएच.डी. पात्रतेचा विचार करावा. ये आपके बस का काम नही है…’  असे ट्विट करून चाकणकर यांनी चंद्रकांत पाटलांच्या शैक्षणिक पात्रतेवरच शंका घेतली आहे. विशेष म्हणजे भाजप नेते विनोद तावडे हे राज्याचे शिक्षणमंत्री असताना त्यांचीही शैक्षणिक पात्रता वादात सापडली होती. आता चाकणकरांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्याच शैक्षणिक पात्रतेवर शंका घेतली आहे. चंद्रकांत पाटील पोस्टग्रॅज्यूएट आहेत की नाहीत, अशी चर्चा आता चाकणकर यांच्या ट्विटमुळे सुरू झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा