बारावीच्या गुणपत्रिकेवर आता अनुत्तीर्णऐवजी फेरपरीक्षेस पात्र शेरा,या परीक्षेपासूनच नियम लागू

0
87
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेप्रमाणेच ( दहावी) आता बारावीच्या गुणपत्रिकेवरीलही अनुत्तीर्ण शिक्का पुसला जाणार असून नियमित परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर आता अनुत्तीर्णऐवजी फेरपरीक्षेस पात्र आणि फेरपरीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र असा शेरा देण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय आजच जारी करण्यात आला.

 गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण असा शेरा दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो, म्हणून हा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील दोन महत्वाचे टप्पे असून या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे काही विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही निदर्शनास आले आहे. ही परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण येऊ नये म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

 राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या निर्णयानुसार, नियमित परीक्षा देणारा विद‍्यार्थी सर्व विषयांत उत्तीर्ण असेल तर उत्तीर्ण असा शेरा दिला जाईल. नियमित परीक्षेत श्रेणी विषयांसह एक किंवा दोन विषयांत विद्यार्थी अनुत्तीर्ण असल्यास फेरपरीक्षेसाठी पात्र आणि नियमित परीक्षेत श्रेणी विषयांसह तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवरही फेरपरीक्षेसाठी पात्र असाच शेरा दिला जाईल. हा निर्णय सध्या बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या निकालापासूनच लागू केला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा