येस बँकेवरील निर्बंधांचा औरंगाबाद मनपाला फटकाः सिटी बसच्या तिकिटाचे 8 कोटी अडकले

0
43
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर घातलेल्या निर्बंधाचा फटका औरंगाबाद महापालिकेलाही बसला असून स्मार्ट सिटी बसच्या तिकिटांतून दररोज जमा होणारी तब्बल ८ कोटी २२ लाख रुपयांची रक्कम या बँकेत अडकून पडली आहे. उशिराने जाग आलेल्या अधिकाऱ्यांनी आता एसबीआयमध्ये खाते उघडून त्या खात्यात तिकिटांची रक्कम जमा करण्यास सुरूवात केली आहे.

  23 जानेवारी 2019 पासून औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटीच्या पॅनसिटी प्रकल्पाअंतर्गत स्मार्ट बससेवा सुरू करण्यात आली. याअंतर्गत सध्या शहरात 90 बस रस्त्यावर धावत आहेत. बसच्या तिकिटांतून रोज सरासरी 3 ते सव्वा तीन लाख रुपये जमा होतात. ही रक्कम रोजच्या रोज बँक खात्यात जमा केली जाते. त्यासाठी स्मार्ट सिटी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी येस बँकेत खाते उघडले होते. आतापर्यंत त्या खात्यातच ही रक्कम जमा केली जात होती. मात्र, अचानक रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. या बँकेतून एकावेळी पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कमही काढता येणार नाही. त्यामुळे सिटी बसच्या तिकिट विक्रीचे पैसे या बँकेत अडकले आहे. सध्या या खात्यात सिटी बसचे एकूण 8 कोटी 22 लाख रुपये जमा आहेत. दरम्यान, आर्थिक निर्बंध लादल्यानंतर येस बँकेच्या अधिकाऱ्यांनीच सिटी बसचा दैनंदिन महसूल खात्यात स्वीकारण्यास महापालिकेला नकार कळविला. त्यामुळे जाग आलेल्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघले आहे. त्यात रोजच्या रोज उत्पन्नाची रक्कम जमा केली जात आहे.

 स्मार्ट सिटीचे २८१ कोटी रुपयेही ठेवले होते येस बँकेतचः स्मार्ट सिटीअंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून आलेला निधीही स्मार्ट सिटी बोर्डाने येस बँकेतच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अधिकाऱ्यांनी 281 कोटींचा निधी येस बँकेतच ठेवींच्या स्वरुपात जमा केला होता. मात्र, पुढे वर्षभरानंतर स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे हा निधी इतर राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात आल्याने हा निधी आता सुरक्षित आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा