अंबाजोगाईच्या रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग तीन,चारची रिक्त पदे भरणार

0
122

मुंबई: स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग तीन व वर्ग चारची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठीची आवश्यक ती कार्यवाही वैद्यकीय शिक्षण विभागाने तात्काळ सुरु करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासंदर्भातील बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार संजय दौंड, वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ.संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अनेक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वर्ग तीन व वर्ग चारची पदे रिक्त असल्याने वैद्यकीय सेवेवर ताण येतो. त्यामुळे ही रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही विभागाने तात्काळ सुरु करावी. स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची क्षमता वाढवताना याबाबत सविस्तर अभ्यास करुन वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबत कार्यवाही करावी, असे देशमुख म्हणाले.

स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आवश्यक असणारे एमआरआय मशीन बसवणे, कॅथलॅब सुरु करणे आणि भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेप्रमाणे नूतनीकरण, सर्जिकल मेडिकल स्टोअरचे अनुदान मिळवणे, रुग्णालयासाठी आवश्यक असणारे नवीन व्हेंटिलेटर यासाठी या रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी वेळोवेळी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करावा, असेही देशमुख यांनी यावेळी सूचित केले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून रुग्णालयाची डागडुजी, सर्जिकल इमारतीच्या फेजचे बांधकाम, नवीन ड्रेनेज सिस्टीम करणे याबाबत पाठपुरावा करुन ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मुंडे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा