भाजी खरेदीसाठीची गर्दी कमी करा, अन्यथा खैर नाहीः अजित पवारांचा इशारा

0
23
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः इटली, अमेरिका, स्पेनमधील कोरोना बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणे बंद करावे. घरातच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर भाजीखरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर टाळेबंदीचा उद्देशच धोक्यात आला आहे. जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरुच ठेवलं तर सद्यस्थितीचा पुनर्विचार करुन कठोर उपाय योजावे लागतील, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

मोजक्याच लोकांमुळे धक्काः बेजबाबदारपणाने वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकायचा असेल तर बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा