मध्य प्रदेशच्या राज्यपालांची सुटी केंद्राकडून तडकाफडकी रद्द, लखनऊहून भोपाळमध्ये दाखल

0
600
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारमधील त्यांच्या समर्थक १९ मंत्री आणि आमदारांनीही राजीनामे दिल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांची सुटी तडकाफडकी रद्द केली असून ते लखनऊहून भोपाळमध्ये लगेच दाखलही झाले आहेत.

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन हे होळी साजरी करण्यासाठी पाच दिवसांच्या सुटीवर लखनऊला गेले होते. मात्र मध्य प्रदेशात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांची सुटी तडकाफडकी रद्द केली आहे. सुटी रद्द होताच टंडन हे लखनऊहून भोपाळला पोहोचलेही आहेत. केंद्र सरकारने राज्यपालांचीच सुटी रद्द केल्याचे घटनेचे अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहेत. भाजपने मध्य प्रदेशात पुन्हा सत्ता स्थापण्याची जोरदार तयारी केली असल्याचा अर्थही त्यातून काढला जाऊ लागला आहे.

हेही वाचाः १९६० च्या इतिहासाची पुनरावृत्तीः काँग्रेसच पाडणार मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार?

काँग्रेसच्या १९ मंत्री आणि आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिल्यामुळे कमलनाथ सरकार अस्थिर झाल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशात हातची गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने राबवलेल्या ‘ऑपरेशन लोटस’ मोहिमेला यश येत असल्याचे दिसू लागल्यामुळे केंद्र सरकारने राज्यपाल टंडन यांची सुटी रद्द केली  आहे. दरम्यान, आज सायंकाळी भोपाळमध्ये काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होत आहे. या बैठकीच्या दोन तासांनंतर भाजपच्या विधिमंडळ पक्षाचीही बैठक होत आहे. या दोन्ही बैठकांनंतर मध्य प्रदेशातील राजकीय चित्र स्पष्ट होणार असून त्यामुळे राज्यपालांनी राज्यात असणे महत्वाचे समजून त्यांना लखनऊहून भोपाळला माघारी बोलावण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा