आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या भावना वाचू शकते. ते तुम्हा मंजूर आहे का?

0
87

तुम्हाला आवडो की न आवडो, परंतु जाहिरातदार, तंत्रज्ञानातील दिग्गज, सीमा सुरक्षा दलांकडून आपल्या मूडवर नजर ठेवण्यासाठी फेस ट्रॅकिंग सॉफ्टवेअरचा वापर करत आहेत. तुमच्या इच्छेविरुद्ध असे करणे तुम्हाला आवडेल का?…

एखाद्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एखाद्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा तपासून पाहण्यासाठी वापर केला तर त्यामुळे किती मोठा धोका निर्माण होऊ शकेल? याचाही विचार करायला हवाच.

आपल्या ग्राहकांना नेमकी कोणती उत्पादने पसंत पडतात, त्यांच्या आवडीनिवडी कोणत्या हे जाणून घेण्यासाठी हल्ली जाहिरातदार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू लागले आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांकडूनही हे तंत्र मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही नवीन औद्योगिक क्रांती ठरू पहाते आहे. त्यामुळे त्याचा सर्व प्रकारच्या उद्योगांवर प्रचंड मोठा प्रभाव आणि परिणाम पडणार आहे. भावना समजून घेणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर सर्व प्रकारच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये खूपच महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये आतापासूनच या क्षेत्रावर आपली भक्कम पकड ठेवण्यासाठी स्पर्धा लागली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा योग्य प्रभाव पाडण्यासाठी आपल्या गरजेनुसार आपल्या मशिनरी जास्तीत जास्त संवेदनशील असल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे.

आपण आपली आई किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांपेक्षा कितीतरी जास्त वेळ स्मार्टफोनवरच घालवतो. त्यामुळे तुमच्या आई किंवा अन्य कुणाहीपेक्षा तुमचा स्मार्टफोनच तुम्हाला जास्त ओळखतो आणि जास्त पाहातो. तुमचा चेहरा आणि तुमच्या आवाजातून कोणत्या प्रतिक्रिया उमटतात, हे जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञान जागा घेऊ पहाते आहे. तुम्ही दीर्घकाळापासून तणावात असाल तर तुम्हाला त्याची सूचना लगेच मिळू शकते. ही सूचना तुम्ही जितक्या लवकर ध्यानात घ्याल, तितक्या लवकर तुम्हाला त्याबाबत काही तरी करता येऊ शकेल.

पंरतु इमोशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे तुमच्या भावना आणि मूडवर देखरेख ठेवणारे तंत्रज्ञान चिंता वाढवणारेही ठरते आहे. आपल्या भावना एखाद्या यंत्राद्वारे वाचल्या जात आहेत, हे तुम्हाला आवडेल का? यंत्राव्दारे वाचल्या गेलेल्या या भावनांच्या डेटाचा नागरिकांच्या फायद्यासाठीच वापर केला जाईल की नाही, हे आपणाला कसे कळणार ? आपल्या नियोक्त्याने आपण कामावर असताना आपले भावनिक प्रोफाइल स्कॅनिंग केल्याचे किंवा त्यांनी आपले तणाव व्यवस्थापन आणि एकूणच कार्यक्षमतेबद्दल निर्णय घेतलेला आपणाला आवडेल का ? आपले भावनिक विश्व आणि आपल्या शरीराचा डेटा विमा कंपन्यांनी वापरला तर त्याचे काय?

‘भावनिक कृत्रिम बुद्धीमत्ता : समांतर माध्यमाचा उदय’ या पुस्तकाचे लेखक प्रोफेसर अँड्र्यू मॅकस्टे यांच्या मते भविष्यातील जीवनाच्या संधीवर प्रभाव आणि विशेषतः कामाच्या ठिकाणी परिणाम साधणार असेल तर भाविनिक कृत्रिम बुद्धीमत्ता प्रचंड घातक आहे. ३६० डीग्रीमध्ये पाळत ठेवणे म्हणतात, ती हीच. त्याचा कोणाला फायदा होणार आहे? व्यापक अर्थाने लोकांच्या समूहाला म्हणजेच कामगारांच्या दृष्टीने ते अजिबात उपयुक्त ठरणार नाही. आमच्याकडे जसा या तंत्रज्ञानाचा संच आहे, तसाच आर्थिक संधींचाही संच आहे. या वित्तीय संधी नैतिकदृष्ट्या लोकांना भुरळ घालणाऱ्या असतील. पैश्यांच्या मागे पळत सुटा, असे नवे धोरण त्यातून जन्माला येईल.

भावनिक कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरातून सकारात्मक बाबींच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त त्रासदायक उदाहरणेच जास्त निदर्शनास येऊ लागली आहेत. या शिवाय आपणाला आवडो की न आवडो भावनिक कृत्रिम बुद्धीमत्ता आपल्या जीवनाचा भाग बनू पहात आहे, नव्हे त्याने आपल्या जीवनात शिरकाव करून टाकला आहे. तुम्ही लंडनच्या पिकाडीली सर्कसमधील इरोस स्टॅच्यूजवळ उभे राहिलात आणि रस्त्यावरील भल्या मोठ्या जाहिरात स्क्रीनकडे नजर टाकली तरी त्या स्क्रीनवर असलेले दोन कॅमेरे तुम्हाला रेकॉर्ड करतील. जेव्हा हे कॅमेरे चेहरा ओळखतील तेव्हा हे तंत्रज्ञान तुमचे वय, लिंग आणि तुम्ही हसत आहात की तुमचा चेहरा रडका आहे याच्या आधारावर तुमच्या मूडचा अंदाज बांधेल. तुम्ही चश्मा वापरता की नाही, दाढी ठेवता की क्लिन शेव्ह्ड आहात, अशी तुम्ही काही वैशिष्ट्यांची नोंदही हे तंत्रज्ञान घेऊन ठेवेन.

या सगळ्या नोंदी कशासाठी ? तर तुमचा मूड, वैशिष्ट्ये, आवडी- निवडी पाहून त्या जाहिरातीच्या स्क्रीनवर तुमच्या मूडनुसार जाहिरात डिस्प्ले करण्यासाठी. एखादी व्यक्ती कॅमेऱ्यात किती काळ राहिली, त्यावरून त्या जाहिरातीत त्या व्यक्तीला किती रस होता, याचेही मूल्यांकन त्यातून केले जाते. एखाद्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा तपासून पाहण्यासाठी भावनिक कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केला गेला तर काय करायचे? त्यामुळे त्या व्यक्तीला धोका निर्माण होणार नाही का?, असा इशारा ऑक्सफर्ड विद्यापीठातील इंटरनेट इन्सिट्यूटचे डेटा इथिक्सचे तत्वज्ञ डॉ. ब्रेन्ट मिटेलस्टॅड देतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा