इस्रो नेहमीच कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त काम करण्यावर भर देत आली आहे. चांद्रयान-२ चा खर्चही अत्यंत कमी होता. जवळपास ९७८ कोटी रुपये. हा खर्च स्टॅचू ऑफ युनिटी आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. हॉलिवूड चित्रपट अवेंजर्स: एंडगेमचे बजेट यापेक्षा तिप्पट होते.
- सचिन तेगमपुरे
चांद्रयान-2 हा भारताचा
एक अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प. संपूर्ण जगाचे लक्ष या मोहिमेकडे होते. भारताची
अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारे ऑर्बिटर आणि चंद्राच्या
पृष्ठभागावर उतरून संशोधन करण्याची क्षमता असलेले लँडर विक्रम व रोव्हर प्रज्ञान हे तिन्ही एकत्र
पाठविण्याचा निर्णय घेतला. या अभियानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे चंद्राच्या
ज्या पृष्ठभागावर उतरण्याचा आजवर कोणत्याही देशाने प्रयत्न केला नाही, त्या भागावर
म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवार विक्रम आणि प्रज्ञान उतरणार होते.
२२ जुलै २०१९ रोजी
जीएसएलव्ही मार्क-३ या भारताच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटमार्फत चांद्रयान अवकाशात
प्रक्षेपित करण्यात आले. २० ऑगस्ट रोजी ऑर्बिटर यानापासून वेगळे करण्यात आले व
चंद्राभोवतीच्या कक्षेत प्रस्थापित केले गेले. जवळपास ४६ दिवसांनी
७ सप्टेंबरच्या पहाटे १:५५
वाजता लँडर विक्रम हे रोव्हर प्रज्ञानला घेऊन पृष्ठभागावर उतरणार होते. पण
दुर्देवाने हा प्रयत्न अयशस्वी ठरला व इस्रोचा लँडर शी संपर्क तुटला. याचा अर्थ
आपण असे म्हणू शकतो
की, हे अभियान अंशतः सफल झाले, कारण पुढचे १ वर्ष ऑर्बिटर चंद्राभोवती प्रदक्षिणा
घालत रहाणार आहे आणि आपल्याला चंद्राची माहिती पुरविणार आहे.
या मोहिमेकडे संपूर्ण
जगाचे लक्ष होते. त्याची कारणेही तशीच आहेत. एक म्हणजे चांद्रयान-१ हे अत्यंत
यशस्वी अभियान होते. या मोहिमेने चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा भारत हा जगातील
पहिलाच देश ठरला. त्यामुळे भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेचे महत्व अधिक वाढले. दुसरे
कारण असे की, चांद्रयान-२ हे चंद्राच्या ज्या भागावर कायम अंधार असतो, त्या दक्षिण
ध्रुवाचा अभ्यास करण्यासाठी उतरणार होते. या ठिकाणी यापूर्वी कुठल्याच देशाने आपले
अंतराळ यान पाठविलेले नव्हते. तिसरे कारण आहे इस्रोची काम करण्याची पद्धत. जी कमीत
कमी खर्चात जास्तीत जास्त कामावर भर देते.
चांद्रयान-२ हे खास
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करण्यासाठी बनवण्यात आले. हे यान चंद्राच्या दक्षिण
ध्रुवाचा अभ्यास करणार ही बाब जगाच्या दृष्टीने फार महत्वाची होती. विशेषतः अमेरिका
व जपानच्या दृष्टीने जास्त महत्वाची होती. कारण नासा २०२४ पर्यंत लुनार ऑर्बिटल
प्लॅटफॉर्म गेटवे या नावाने एक स्पेस स्टेशन ( अंतराळ स्थानक) चंद्राच्या कक्षेत
उभारण्याच्या तयारीत आहे. जेणेकरून अतिशय लांब पल्ल्याच्या अंतराळ मोहिमांसाठी हे
अंतराळ स्थानक एक उपयुक्त थांबा ठरेल. भारताची इस्रो आणि जपानची ‘जपान ऐरोस्पेस
एक्सप्लोरेशन एजन्सी’ (JAXA)
हे संयुक्तपणे २०२३ मध्ये
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची एक अंतराळ स्थानक उभारण्यासाठी काय उपयुक्तता आहे हे
तपासण्यासाठी एका अंतराळ मोहिमेची तयारी करत आहेत. त्यामुळे भारताबरोबरच अमेरिकेची
नासा आणि जपानची JAXA यासाठी सुध्दा हे अत्यंत महत्वाचे मिशन होते.
जीएसएलव्ही-मार्क३ हे इस्रोचे सर्वात शक्तिशाली रॉकेट. पण चांद्रयान-२ ला थेट चंद्रापर्यंत पोहोचवू शकेल, एवढी क्षमता या रॉकेटची नव्हती. या समस्येचा तोडगा नासाप्रमाणे आणखी मोठे रॉकेट निर्माण करून न काढता इंजिनीरिंग व अचूक गणिती मोजमापाद्वारे पृथ्वी व चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून काढण्यात आला. त्यामुळे चांद्रयान-२ मोहिमेचा खर्च कमी झाला.

दुसरे
कारण ज्याचा मी उल्लेख केला ते म्हणजे या मोहिमेवर झालेला खर्च. इस्रो नेहमीच कमीत
कमी खर्चात जास्तीत जास्त काम करण्यावर भर देत आली आहे. उदाहरणार्थ या आधीची मंगळयान
मोहीम इस्रोने फक्त ४५० कोटी रुपयांमध्ये यशस्वी करून दाखविली होती. तुलनाच करायची
तर नासाच्या ‘मेवन’ या मंगळ मोहिमेसाठी ४८१७
कोटी रुपये खर्च आला होता.
चांद्रयान-२ चा खर्चही अत्यंत
कमी होता. जवळपास ९७८ कोटी रुपये. हा खर्च स्टॅचू ऑफ युनिटी आणि अरबी समुद्रातील
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या निम्म्यापेक्षा कमी आहे.
हॉलिवूड चित्रपट अवेंजर्स: एंडगेमचे बजेट यापेक्षा तिप्पट होते. फक्त काटकसरच नाही
तर विविध देशांच्या उपग्रहांच्या प्रक्षेपणातून इस्रोने देशाला फार मोठी कमाई ही
करून दिली आहे. २०१७ मध्ये पीएसएलव्ही-सी३७ च्या सहाय्याने इस्रोने एकाच वेळेस १०४
उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करून एक जागतिक विक्रम नोंदवला होता.
जीएसएलव्ही-मार्क३ हे
इस्रोचे सर्वात शक्तिशाली रॉकेट. पण चांद्रयान-२ ला थेट चंद्रापर्यंत पोहोचवू शकेल,
एवढी क्षमता या रॉकेटची नव्हती. या समस्येचा तोडगा नासाप्रमाणे आणखी मोठे रॉकेट
निर्माण करून न काढता इंजिनीरिंग व अचूक गणिती मोजमापाद्वारे पृथ्वी व
चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून काढण्यात आला. त्यामुळे चांद्रयान-२
मोहिमेचा खर्च कमी झाला.
भारताच्या अशा या
बहुआयामी अंतराळ संशोधन संस्थेची चांद्रयान-२ ही मोहीम पूर्णतः नसली तरी अंशतः सफल
झालेली आहे. कारण लँडर व रोव्हर नाही पण ऑर्बिटर व्यवस्थित काम करत आहे. या क्वचित
अपयशाने खचून न जाता इस्रोचे वैज्ञानिक आणखी जोमाने पुढील वाटचाल करतील याची मला
खात्री आहे. देशवासीयांच्या शुभेच्छा आहेतच….!