महात्मा फुलेः परिवर्तनाची होकार घंटा!

0
80
संग्रहित छायाचित्र.

एखादा विचार आपल्या अस्तित्वाला हादले देऊ लागला आणि वैचारिक पातळीवर त्या विचाराला सामोरे कुवत संपली की, तो मांडणाराच्या अंगावर मारेकरी सोडणे ही काही आजची परंपरा नाही. मारेकऱ्यांमार्फत परिवर्तनाचा मुडदा पाडणे ही प्रतिगाम्यांची प्राचीन काळापासूनची रणनिती राहिली आहे. ती फुलेंच्या काळात होती, तशी ती आजही जिवंत आहे!

  • प्रा. डॉ. संतोष रणखांब (लेखक परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.)

सामाजिक चळवळींत काम करताना काही वाक्य सतत कानावर पडत असतात. त्यातील नेहमी बोलले जाणारे वाक्य म्हणजे भारतीय समाजात परिवर्तन अशक्य आहे. ही परिवर्तनवादी लोकांमधील नकार घंटा असते. वास्तविक भारतीय समाजातील परिवर्तनाच्या इतिहासाचा विचार करता सामाजिक परिवर्तनासाठी आवश्यक असणारे परिवर्तनाची हत्यारे व पद्धती यांचा विचार करावा लागेल.  

सामाजिक परिवर्तनाच्या या लढाईत अनेक भारतीय नररत्नांना प्रस्थापितांविरोधात हल्ला चढवताना मोठा त्याग व बलिदान करावे लागले आहे हे स्पष्टपणे लक्षात येते. त्यांच्या या त्याग व बलिदानामधून परिवर्तन झालेले आहे हे सिद्ध होते. महात्मा बसवेश्वर ते संत परंपरेतील संत तुकाराम, अलीकडच्या काळात डॉ. नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, प्रा. डॉ. कलबुर्गी, अँड. गोविंद पानसरे यांच्या विचारांमधून परिवर्तन होत आहे, हे लक्षात येताच त्यांना संपवण्यासाठी मोठे प्रयत्न केले, त्यात अनेकांचा जीव घेतला गेला.

महात्मा जोतीराव फुले यांनी मुळात समाज परिवर्तनासाठी जे क्रांतीकारक पाऊल उचलले ते म्हणजे महिलांना शिक्षण देणे, केशवपन प्रथा बंदी, अस्पृश्यता निवारण व बहुजनातील अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रसार यावर विशेष भर दिला.  महात्मा फुले त्यांनी हाती घेतलेल्या या सर्व सामाजिक बदलांमध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी सुरू केलेले प्रयत्न पाहून तत्कालीन सनातनी कर्मठ ब्राम्हण्यवादी लोक हादरले. त्यांनी विविध प्रकारे विरोध सुरू केला. क्रांतिज्योती सावित्रीबाईंना शिकवायला जाताना त्रास देणे सुरू केले. महात्मा फुलेंवर मारेकरी पाठवले. काहीवेळातर जाणिवपूर्वक काही लोकांना समाजसुधारक म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला. पण फुलेंचे कार्य योग्य पद्धतीने चालवले गेल्याने त्यांच्या परिवर्तनाचा निर्विवाद विजय झाला.

एखादा विचार आपल्या अस्तित्वाला हादले देऊ लागला आणि वैचारिक पातळीवर त्या विचाराला सामोरे जाण्याची आणि त्याचे खंडण करण्याची कुवत संपली की, तो विचार मांडणाराच्या अंगावर मारेकरी सोडणे ही काही आजची परंपरा नाही. महात्मा फुले किंबहुना त्याही आधीच्या काळापासून प्रतिगाम्यांनी याच पद्धतीचा अवलंब केल्याचे दाखले इतिहासात सापडतात. मारेकऱ्यांमार्फत परिवर्तनाचा मुडदा पाडणे ही प्रतिगाम्यांची प्राचीन काळापासूनची रणनिती राहिली आहे. ती फुलेंच्या काळातही होती, तशी ती आजही जिवंत आहे.

आज हजारो स्त्रिया शिक्षण घेत आहेत. त्यातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहेत, त्याचे श्रेय महात्मा फुल्यांनी घडवून आणलेल्या सामाजिक परिवर्तनाचेच! विधवांचे केशवपन करणाऱ्या न्हाव्यांचा संप पुकारून ही प्रथा कायमची बंद करण्याचे काम महात्मा जोतीराव फुले यांनी केले. आज ही प्रथा कायमची बंद होऊन अनेक विधवा महिलांना त्यांच्या मुलांकडून मानसन्माची वागणूक मिळत असते. प्रतिगामी विचारांची भरपूर खोलवर असलेली पाळेमुळे उखडून फेकण्यात महात्मा फुलेंना यश मिळाले.  प्रतिगाम्यांनी संत परंपरेप्रमाणेच महात्मा फुलेंच्याही विचारात घुसून त्याची नासधूस करण्याचे षडयंत्रही योजले होते. पण ते फलदायी ठरले नाही. अस्पृश्यता निवारणासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी मांडलेले विचार व त्यांचे आचरण छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नाने यशस्वी झाले आहे.

ज्ञानाचा प्रकाश पुढे नेऊन अज्ञानाचा अंधकार दूर करण्यातही आधुनिक कालखंडात महात्मा फुले यांच्या विचारांचा विजय होताना दिसतो. पुरोगामी विचारांची मोठी शिदोरी महात्मा जोतीराव फुले यांनी आपणास दिलेली आहे. अकरा एप्रिल ही महात्मा जोतीराव फुलेंची जयंती. त्यानिमित्त या समाजक्रांतिकारकास विनम्र अभिवादन!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा