विधवा स्त्रिया, निराधार, दिव्यांग, कारागिरांना देणार अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका

0
92

मुंबई : ज्या कुटुंबांचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा दिव्यांग किंवा 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही, ग्रामीण कारागीर अशांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका देण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेची शिधापत्रिका मिळण्याबाबतची मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री. भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेच्या कुटुंबांना दरमहा 35 किलो अन्नधान्य, रु. 2/- प्रतिकिलो गहू व रु. 3/- प्रतिकिलो तांदूळ या दराने वितरीत करण्यात येते. त्याप्रमाणे पुढील व्यक्तींना/कुटुंबांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत.

एकटे राहत असलेले दुर्धर आजारग्रस्त/दिव्यांग/विधवा/60 वर्षावरील वृद्ध, ज्यांना कुठलाही कौटुंबिक वा सामाजिक आधार अथवा कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही. आदिम आदिवासी कुटुंबे (माडिया, कोलाम, कातकरी), भूमिहीन शेतमजूर, अल्पभुधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर उदा.कुंभार, चांभार, मोची, विणकर, सुतार तसेच झोपडपट्टीतील रहिवासी विशिष्ट क्षेत्रात रोजंदारीवर काम करुन उपजीविका करणारे नागरीक जसे हमाल, मालवाहक, सायकलरिक्षा चालवणारे, हातगाडीवरुन मालाची ने-आण करणारे, फळे आणि फुले विक्रेते, गारुडी, कचऱ्यातील वस्तू गोळा करणारे तसेच निराधार व अशा प्रकारे काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यक्तींची कुटुंबे,. कुष्ठरोगी/बरा झालेला कुष्ठरोगी कुटुंब असलेली कुटुंबे. या सर्व व्यक्तींना अथवा कुटुंबांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ नियमानुसार देण्यात येतो. कोणताही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा