महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प वाचा एका क्लिकवर

0
100

मुंबई: जगभरात ओढवलेले कोरोनाचे संकट आणि जागतिक मंदी या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आणि वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.

तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय महिलादिना निमित्ताने राज्यातील महिलांना शुभेच्छा देतांना महिलांच्या घराच्या स्वप्नपुर्तीसाठी मुद्रांक शुल्कात एक टक्का कर सवलतीची विशेष योजना या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे. वर्षभर कराव्या लागलेल्या कोरोनाच्या संकटाचा उल्लेख करुन पवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या कोविड योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

महाविकास आघाडी शासनाने सादर केलेल्या या दुसऱ्या अर्थसंकल्पात महसुली जमा 3 लाख ६८ हजार ९८७ कोटी रुपये व महसुली खर्च ३ लाख ७९ हजार २१३ कोटी रूपये अंदाजित. १० हजार २२६ कोटी रुपये महसूली तूट आहे. अर्थव्यवस्थेला गती देणे व रोजगार निर्मितीकरीता मुलभूत बाबीवर खर्च करण्यासाठी ५८ हजार ७४८ कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून, राजकोषीय तूट ६६ हजार ६४१ कोटी रुपये असणार आहे.

सन २०२१-२२ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेसाठी ११ हजार ३५ कोटी रुपये तरतूद उपलब्ध होणार आहे. सन २०२१-२२ मध्ये कार्यक्रम खर्चाची रक्कम १ लाख ३० हजार कोटी रुपये एवढी निश्चित. त्यामध्ये अनुसूचित जाती उपयोजनेच्या १० हजार ६३५ कोटी रुपये व आदिवासी विकास उपयोजनेच्या ९ हजार ७३८ कोटी रुपये नियतव्ययाचा समावेश असणार आहे.

महिलांच्या नावे घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूटः जागतिक महिला दिना निमित्ताने महिलांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. केवळ महिला किंवा महिलांच्या नावाने होणाऱ्या घराचे अभिहस्तांतरण किंवा विक्री करारपत्राचे दस्त नोंदणी केल्यास मुद्रांक शुल्कामध्ये प्रचलित दरातून १ टक्का सवलत देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे राज्याला अंदाजे रुपये १ हजार कोटीच्या महसुली तुटीची शक्यता या अर्थसंकल्पात वर्तविण्यात आली आहे.

उत्पादन शुल्कात वाढ, दारू महागणारः देशी मद्याचे ब्रँडेड व नॉन ब्रँडेड असे दोन प्रकार निश्चित करुन त्यापैकी देशी ब्रँडेड मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर, निर्मिती मुल्याचा २२० टक्के किंवा रुपये १८७ प्रती लिटर यापैकी जे अधिक असेल ते, असा प्रस्तावित केला आहे. यामुळे अंदाजे रुपये ८०० कोटी अतिरिक्त महसूल शासनास मिळणे अपेक्षित आहे. मद्यावर मुल्यवर्धित कर कायद्याच्या अनुसूचीत ‘ख’ नुसार सध्या अस्तित्वात असलेल्या मुल्यवर्धित कराचा दर ६० टक्के तो ६५ टक्के करण्याचे प्रस्तावित आहे. मूल्यवर्धित कर कायद्यातील कलम ४१(५) नुसार मद्यावर सध्या अस्तित्वात असलेल्या मुल्यवर्धित कराचा दर ३५ टक्के वरुन ४० टक्के करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे अंदाजे रुपये १ हजार कोटी अतिरिक्त महसूल शासनास मिळणे अपेक्षित आहे.

अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्येः

महिलांसाठीः राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेअंतर्गत गृहखरेदीची नोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत.

  • ग्रामीण विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना, शासनाकडून राज्य परिवहन महामंडळास पर्यावरणपूरक दीड हजार सीएनजी व हायब्रीड बस उपलब्ध करून देणार.
  • मोठ्या शहरातील महिलांना प्रवासासाठी “तेजस्विनी योजनेत आणखी विशेष महिला बस उपलब्ध करुन देणार.
  • महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 3 टक्के नियतव्यय राखून ठेवण्याचा निर्णय.
  • राज्य राखीव पोलीस दलाचा राज्यातील पहिला स्वतंत्र महिला गट स्थापन करणार.

आरोग्यसेवेतील पायाभूत सुविधांवर भरः  आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी ७ हजार ५०० कोटी रुपये किमतीचा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण करण्यात येईल. महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये दर्जेदार आरोग्य सेवांसाठी येत्या ५ वर्षात ५ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणार, त्यापैकी ८०० कोटी रुपये यावर्षी तरतूद. कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात १५० रूग्णालयांमध्ये सुविधा.

 सात नवीन वैद्यकीय महाविद्यालयेः सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये. अमरावती व परभणी येथेही वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न ११ शासकीय परिचर्या विद्यालयांचे महाविद्यालयांमध्ये रुपांतर. १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून भौतिकोपचार व व्यवसायोपचार महाविद्यालयांची स्थापना. जिल्हा रूग्णालयामध्ये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, “पोस्ट कोविड काउन्सिलिंग व ट्रीटमेंट सेंटरची स्थापना करणार. सार्वजनिक आरोग्य विभागासाठी ८ हजार ९५५ कोटी २९ लाख रुपये तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी १ हजार ९४१ कोटी ६४ लाख रुपये तरतूद.

शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जः तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषित. शेतकऱ्यांना कृषीपंप वीज जोडणी देण्याकरीता महावितरण कंपनीला दरवर्षी १ हजार ५०० कोटी रुपये निधी भागभांडवल.

शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलात ३३ टक्के सूटः थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना ३३ टक्के सूट, ऊर्वरित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा मार्च २०२२ पर्यंत केल्यास राहिलेल्या ५० टक्के रकमेची अतिरीक्त माफी, ४४ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या ६६ टक्के, ३० हजार ४११ कोटी रूपये रक्कम माफ. शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी एकूण २ हजार १००  कोटी रुपये अंदाजित किंमतीचा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प.

 प्रत्येक तालुक्यात भाजीपाला रोपवाटिकाः प्रत्येक तालुक्यात किमान एक, याप्रमाणे सुमारे ५०० नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार. राज्यातील ४ कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या ३ वर्षात ६०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देणार. शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन किंवा कुक्कुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टिंगकरता अनुदान. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागास ३ हजार २७४ कोटी रुपये नियतव्ययची तरतूद.

 नांदेड- जालना २०० किमीचा नवीन महामार्गः नांदेड ते जालना या २०० किलोमीटर लांबीचे ७ हजार कोटी रूपये अंदाजित रकमेचे  द्रुतगती जोड महामार्गाचे नवीन काम. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-नाशिक महामार्गावर मेगा इलेक्ट्रीक व्हेइकल चार्जिंग सेंटर स्थापन करण्यात येणार.

  • पुण्याबाहेरून चक्राकार मार्गाची (रिंग रोड) उभारणी, १७० किलोमीटर लांबीच्या २६ हजार कोटी रूपये अंदाजित किंमत.
  • रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी या ५४० किलोमीटर लांबीच्या सागरी मार्गाच्या कामासाठी ९ हजार ५७३ कोटी खर्च अपेक्षित आहे.
  • ग्रामीण सडक विकास योजनेअंतर्गत ग्रामीण रस्ते विकासाची ४० हजार किलोमीटर लांबीची कामे हाती घेणार. १० हजार किलोमीटर लांबीची कामे यावर्षी. १ हजार ७०० कोटी रुपयाची तरतूद.
  • पुणे-नाशिक या मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यास मान्यता. प्रस्तावित लांबी २३५ किलोमीटर, गती २०० किलोमीटर प्रतितास, अपेक्षित खर्च १६ हजार ३९ कोटी रुपये.
  • राज्य परिवहन महामंडळाच्या जुन्या बसेसचे सीएनजी व विद्युत बसेसमध्ये रूपांतर व बसस्थानकांचे आधुनिकीकरणासाठी १ हजार ४०० कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित.

घरकुल योजनाः प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजनांसाठी ६ हजार ८२९ कोटी ५२ लाख रूपये उपलब्ध करुन देण्यात येतील.

जिल्हा परिषद शाळांच्या पुनर्बांधणीसाठी ३ हजार कोटीः शासकीय व जिल्हा परिषद शाळांच्या जीर्णावस्थेतील इमारतींची पुनर्बांधणी व दुरुस्ती करण्याकरीता ३ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार.

  • प्रत्येक महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क स्थापन करण्याचा निर्णय. एकूण ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित. -महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना येत्या महाराष्ट्र दिनी सुरू करण्यात येणार. दोन लाख युवा उमेदवारांना योजनेच्या माध्यमातून रोजगारसंधी.
  • सर्व ग्रामपंचायतींमध्ये शिवराज्य सुंदर ग्राम अभियान राबविण्यात येणार. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार.

कामगारांना सामाजिक सुरक्षाः संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेतून असंघटित कामगारांची नोंदणी व सामाजिक सुरक्षा व कल्याणासाठी समर्पित कल्याण निधी, बीजभांडवल २५० कोटी रुपये. स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला निधी देण्यासाठी साखर कारखान्यांकडून ऊस गाळपानुसार प्रतिटन १० रुपये आकारुन तेवढाचा निधी शासनाकडून देण्यात येणार.

प्राचीन मंदिरांचा विकासः राज्यातील धूतपापेश्वर मंदिर (ता.राजापूर,जि.रत्नागिरी), कोपेश्वर मंदिर,खिद्रापूर (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर), एकविरा माता मंदिर,कार्ले (ता.मावळ,जि.पुणे), गोंदेश्वर मंदिर (ता.सिन्नर, जि.नाशिक), खंडोबा मंदिर,सातारा (ता.जि.औरंगाबाद), भगवान पुरुषोत्तम मंदिर, पुरुषोत्तमपुरी (ता.माजलगाव, जि.बीड), आनंदेश्वर मंदिर,लासूर (ता.दर्यापूर, जि.अमरावती), शिव मंदिर, मार्कंडा (ता.चामोर्शी, जि.गडचिरोली), या मंदिरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी १०१ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित.

शासकीय निवासी शाळेत सीबीएसई अभ्यासक्रमः अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील एका शासकीय निवासी शाळेमध्ये पथदर्शी तत्वावर इयत्ता ६ वीपासून सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

 मॉडेल आश्रम शाळाः १०० शासकीय आदिवासी आश्रमशाळांचे मॉडेल निवासी शाळांमध्ये रूपांतर करणार.रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा येथे पथदर्शी तत्वावर कातकरी समाजाची एकात्मिक वसाहत. विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती(ड), विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींकरीता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याचे प्रस्तावित.

सारथी, बार्टीला प्रत्येकी १५० कोटीः महाज्योती,सारथी व बार्टी या संस्थांना प्रत्येकी १५० कोटी रुपये,श्री अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी १०० कोटी रुपये,शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळास ५० कोटी रुपये, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळास १०० कोटी रुपये, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाला १०० कोटी रुपये, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळास २०० कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करुन देणार.

तीर्थक्षेत्र विकास आणि स्मारकेः श्री क्षेत्र परळी वैजनाथ (ता.परळी,जि.बीड), श्री क्षेत्र औंढा नागनाथ (ता.औंढा, जि.हिंगोली), श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (ता.त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक), श्री क्षेत्र भीमाशंकर (ता.खेड, जि.पुणे) या तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरीता विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात येणार. श्री क्षेत्र जेजुरी गड (ता.पुरंदर, जि.पुणे), श्री क्षेत्र बिरदेव देवस्थान, श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर (ता.इंदापूर, जि.पुणे), आरेवाडी  (ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली) या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांकरीताही निधी उपलब्ध करून देणार. श्री क्षेत्र मोझरी आणि श्री क्षेत्र कौंडण्यपूर (ता.तिवसा, जि.अमरावती), संत गाडगेबाबा निर्वाणभूमी, वलगांव (ता.जि.अमरावती) येथे मूलभूत सुविधा आराखड्यांकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येणार. श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गड (ता.कळवण,जि.नाशिक), संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर, त्र्यंबकेश्वर (ता.त्र्यंबकेश्वर,जि.नाशिक), श्री क्षेत्र भगवानगड (ता.पाथर्डी,जि.अहमदनगर), श्री क्षेत्र नारायण गड आणि श्री क्षेत्र गहिनीनाथ गड (ता.पाटोदा,जि.बीड) या तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येणार. मोरगाव, थेऊर, रांजगणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड,पाली तसेच सिद्धटेक या श्रद्धास्थानांच्या विकासासाठी अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येणार. संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान श्री क्षेत्र नरसी नामदेव (ता.जि.हिंगोली) या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार. संत बसवेश्वर महाराज यांच्या स्मरणार्थ मंगळवेढा, जि.सोलापूर येथे स्मारक उभे करण्यासाठी सन २०२१-२२ मध्ये आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार. श्री क्षेत्र पोहरादेवी (ता.मानोरा,जि.वाशिम) विकास आराखड्याची कामे पूर्ण करण्याकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा