औरंगाबादः गादीचे वारस आणि रक्ताचे नाते वेगळे असते. देशात आणि राज्यात अनेक दत्तकपुत्रही राजे झाले आहेत. देशात अनेक ठिकाणी जसे गादीचे वारस आहेत, तसे रक्ताचेही आहेत. त्यामुळे भाजप नेते उदयनराजे भोसले शिवसेना नेते यांना संजय राऊतांनी छत्रपती शिवरायांचे वंशज असल्याच्या पुराव्याबद्दल प्रश्न विचारला असेल तर त्याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते,अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या वादात उडी घेतली.
आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून सुरु झालेल्या वादात आपली भूमिका मांडताना शिवरायांचे तेरावे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी शिवसेना स्थापन करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते काय, असा सवाल केला होता. त्याला उत्तर देताना उदयनराजेंनी ते शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून वाद पेटलेला असतानाच नवाब मलिक यांनी संजय राऊतांची पाठराखण करत या वादात उडी घेतली आहे.
औरंगाबादेत पत्रकारांनी नवाब मलिक यांना संजय राऊत- उदयनराजे वादावर छेडले असता त्यांनी आपली भूमिका मांडली. देशातील बर्याच संस्थानिकांनी दत्तक विधानानुसार गादीवर राजपुत्र विराजमान केले आहेत. तुम्हाला गादीचा वारसा आहे की तुमचे आणि छत्रपतींच्या घराण्याचे रक्ताचे नाते आहे, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. राऊतांनी ज्यांना हा प्रश्न विचारला आहे, त्याचे उत्तर त्यांनीच द्यायला हवे. गादीचे वारस आणि रक्ताचे नाते वेगळे असते, असे मलिक म्हणाले. धमक्या देऊन कोणतेही प्रश्न सुटत नसतात त्यामुळे तंगडी तोडण्याची भाषा करण्यापेक्षा मूळ प्रश्नाला उत्तर देणे अपेक्षित आहे, असेही मलिक म्हणाले.